एन-5, व एन -7 येथील जलकुंभावरील टँकरच्या शंभर फेऱ्यांचा भार आजपासून कमी; आयुक्तांच्या सुचनेनंतर अधिकाऱ्यांनी उचलले पाऊल

Foto

औरंगाबाद: गेल्या काही दिवसापासून शहरातील पाणी प्रश्न पेटत असून,सिडको-हडको परिसरात समस्या अधिक गंभीर असल्याचे दिसून येते. नुकत्याच पदाधिकारी,नगरसेवक व अधिकारी यांच्यासह मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक यांची या प्रश्नावर बैठक पार पडली. त्यावेळी आयुक्तांनी केलेल्या सूचनेनुसार आज शुक्रवार पासून, एन -5 व एन -7 येथील जलकुंभवरून सुरू असलेल्या एकूण टँकरच्या फेऱ्या  पैकी 100 फेऱ्यांचा भार  कमी करण्यात आला आहे.  या शंभर फेऱ्या एन-1 येथील  पॉईंटवरून केल्या जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे  हेमंत कोल्हे यांनी सांजवार्ताशी  बोलताना सांगितले.


जायकवाडीहून शहरात येणारे पाणी  135 एम एल डी वरून  25 एम एल डी कमी होऊन 110 एमएलडी वर आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून  शहरातील पाणी प्रश्न पेटला असून, सिडको -हडको सह काही वसाहतींमध्ये सहा ते आठ दिवसात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नुकतेच पवन नगर येथील भाजपाचे नगरसेवक नितीन चित्ते यांच्यासह नागरिकांनी आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने थेट मनपा मुख्यालय गाठत आयुक्तांच्या दालनात ठिय्या दिला. यानंतर पाणीपुरवठा विभागाची बैठक बोलावण्यात आली. या  बैठकीत भाजपा नगरसेवकांनी समान पाणी वाटप करा,नासाडी करणार्‍यांवर कारवाई करा, विविध ठिकाणी असलेली गळती थांबवा, टँकरने करण्यात येणाऱ्या पाणीपुरावठ्यावर नियंत्रण ठेवा आदी मागण्या केल्या होत्या.  यानंतर आयुक्त विनायक यांनी पाहणी करीत अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या होत्या त्यानुसार आज एन-5 व  एन -7 येथील जलकुंभवरील दोन्ही मिळून एकूण टँकरच्या शंभर फेऱ्या एमआयडीसीच्या एन-1 पॉइंटवर वळवल्या आहेत.यामुळे काही प्रमाणात का होईना या जलकुंभवरील टँकरचा भार कमी झाला आहे.